बंधूंनो लक्षात घ्या हा अजितदादाचा वादा आहे, जर तुम्ही पुन्हा सत्ता दिली तर पुढील 5 वर्ष विजबिल माफ आहे, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या असे आश्वासन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर यांच्या प्रचारसभेत जनतेला दिले आहे . बनकर यांच्या प्रचारासाठी अजित पवार काल नाशिकच्या निफाड येथे आले होते.
मी जेवढे उमेदवार उभे केले, तिथे जातोय, भाजप शिवसेनेने काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. पण आपण सर्वजण समाजाच्या विकासासाठी काम करत आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सभा घेत आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत, अमित शाह देखील मिटींग घेत आहेत,असेही ते पुढे म्हणाले आहेत.
आमच्या महायुतीच्या सरकाने गेल्या दोन अडीच वर्षात खूप चांगलं काम केले आहे. काही राजकिय स्थित्यंतरे घडली आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यावेळी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी काही ठरवले होते. माझी सही होती, झिरवाळ यांचीही सही होती, अनेक आमदारांची सही होती. पण त्यावेळी अशी काही घटना घडली की ते झाले नाही.
आपले विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना निवडून आणा, दिलीप काकांनी मतदारसंघात चांगले काम केले आहे. सर्व ताकदवान नेतेमंडळी आणि दिल्लीच केंद्र सरकार आपल्या सोबत आहे, असेही अजित पवार म्हणाले. राज्यात महायुती आणि आमचा उमेदवार काय करणार? हा जाहिरनामा देतोय. केंद्र सरकार पाठिशी आहे, त्यामुळं तुमच्या सर्व योजना पूर्ण करु, अनेक नवनवीन विकासकामे आणू असही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, निफाड हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, निफाड मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील चांदोरी, पिंपळगांव बसवंत, रानवड, निफाड आणि सायखेडा ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. निफाड हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो. २०२४ च्या निवडणुकीत दिलीप बनकर विरुद्ध अनिल कदम असा सामना या ठिकाणी बघायला मिळणार आहे.