नेपाळचे नवे पंतप्रधान केपी शर्मा ओली ( K.P. Sharma Oli ) त्यांच्या पहिल्या अधिकृत परदेश दौऱ्यावर चीनला जात आहेत. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी ओली यांना 2 ते 6 डिसेंबर या कालावधीत अधिकृत भेटीसाठी आमंत्रित केले आहे.
नेपाळमध्ये अशी परंपरा आहे की जो कोणी नवा पंतप्रधान होतो तो प्रथम भारताला भेट देतो.मात्र नेपाळचे पंतप्रधान भारताऐवजी चीनला प्रथम भेट देणार आहेत. मात्र नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी त्यांच्या चीन दौऱ्याबाबत म्हटले आहे की, त्यांच्या या भेटीचा भारतासोबतच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच नेपाळचे भारतासोबत चांगले संबंध आहेत, ते बिघडू शकत नाहीत, असेही ते म्हणाले आहेत.
गुरुवारी, काठमांडू येथे आयोजित कांतिपूर कॉन्क्लेव्हच्या समारोप समारंभात पंतप्रधान ओली म्हणाले की, नेपाळ हा सार्वभौम देश आहे आणि त्यांनी प्रथम कोणत्या देशाला भेट द्यायची हे ठरवण्याचा अधिकार त्यांच्या पंतप्रधानांचा आहे. ते म्हणाले की, माझ्या चीन दौऱ्यामुळे भारताला कोणतीही अडचण येईल असे मला वाटत नाही. नेपाळ आपल्या दोन्ही शेजारी देशांशी समतोल संबंध राखण्यास प्राधान्य देत असल्याचा दावा ओली यांनी केला आहे. .
या कॉन्क्लेव्हमध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पंतप्रधान ओली भारताऐवजी प्रथम चीनला भेट देत असल्याच्या मुद्द्यावर ओली म्हणाले की, जिथे आधी निमंत्रण आले तिथेच जाणार. जिथून निमंत्रण आलेच नाही तिकडे कसे जायचे? दिल्लीतून फोन आल्यावर मी जाण्यास तयार असल्याचे ओली म्हणाले आहेत.
आपले सरकार पडण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेवर पंतप्रधान ओली म्हणाले की, ज्या दिवसापासून मी सत्ता घेतली, तेव्हापासून विरोधक सरकार पडल्याच्या अफवा पसरवत आहेत. ते म्हणाले की, राजकीय स्थैर्यासाठी दोन मोठ्या पक्षांचे सरकार स्थापन केले आहे. ओली म्हणाले की, दोन मोठ्या पक्षांच्या बैठकीमुळे छोट्या पक्षांची बार्गेनिंग पॉवर गेली आहे, त्यामुळे सरकार पडल्याच्या खोट्या अफवा पुन्हा पुन्हा पसरवल्या जात आहेत.