मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या विकासकार्याच्या गतीमुळे रेल्वे,विकासाच्या फास्ट ट्रॅकवर चालत आहे. मोदी सरकारने महाराष्ट्रात तब्बल 1 लाख 64 हजार 605 कोटींची गुंतवणूक रेल्वे विकासासाठी केली आहे. राज्यात नवीन रेल्वे मार्ग, कॉरिडॉर निर्मिती, रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, फ्लायओव्हर,पूल बांधणीमुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान, सुखकर होण्याबरोबरच राज्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे प्रतिपादन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केले आहे.
मुंबईत भाजपा मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.
.वैष्णव यांनी यावेळी राज्यात रेल्वे कडून पायाभूत सुविधा बळकटीकरणासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचे संकल्पचित्र व्हिडिओ सादरीकरणाद्वारे पत्रकार परिषदेत मांडले.देशाच्या विकासात आर्थिक राजधानी मुंबईसह राज्याचा महत्वाचा वाटा असल्याने मोदी सरकारने तब्बल 1 लाख 64 हजार 605 कोटींची गुंतवणूक रेल्वे विकासासाठी केली आहे.याअंतर्गत 6000 किमी चे नवीन ट्रॅक,132 स्थानकांचा अमृत भारत स्थानक कार्यक्रमाअंतर्गत कायापालट,नवीन मेट्रो मार्ग, बुलेट ट्रेन्स ,फ्रेट कॉरिडॉर्स (मालवाहतुकीचे विशेष मार्ग) अशी विविध विकासकामे प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यातील कनेक्टिवीटी वाढवण्याची कामेही सुरू असून जालना-जळगाव नवीन मार्गाद्वारे मराठवाडा तसेच मनमाड इंदोर नवीन मार्गाद्वारे खानदेश ‘जेएनपीटी’ शी जोडला जाईल.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मध्य,पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांवरही अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. एकूण 1,300 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे. राज्यात 16 हजार 240 कोटी खर्च करून 301 किमी चे नवे रेल्वे मार्ग बांधणी सुरू आहे. प.रेल्वे वर मुंबई सेंट्रल,बांद्रा,वसई ,जोगेश्वरी तसेच मध्य रेल्वेवर सीएसटी, एलटीटी, कल्याण,पनवेल ,परेल यासह अन्य स्थानके देखील टर्मिनस होणार आहेत. छोट्या रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास व्हावा ही मोदीजींची विकासदृष्टी आहे म्हणूनच लासलगाव ,बडनेरा, पंढरपूर, नांदगाव यासारख्या छोट्या स्थानकांचा ही पुनर्विकास होत आहे.
मुंबईकरांचा उपनगरी रेल्वेप्रवास होणार सुखकर
लोकल ट्रेनची प्रवासी क्षमता वाढ आणि सुरक्षितता याला प्रधान्य दिले जात असून त्यासाठी 16 हजार 240 कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. 891 कोटी रुपये खर्चून सीएसएमटी ते कुर्ला 5 वी आणि 6 लाइन,मुंबई सेंट्रल ते बोरीवली 6 वी लाइन चे काम सुरू आहे. उपनगरी लोकल रेल्वे मार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे नवीन मार्ग बांधणी वेगाने होत असल्याने येत्या 5 ते 6 वर्षात दररोज 600 ट्रेन्स ट्रॅकवर धावतील त्यामुळे लोकल प्रवाशांना दिलासा मिळेल. गोरेगाव पर्यंत पोहोचलेला हार्बर मार्ग बोरीवली पर्यंत वाढवण्यात येत असून त्यासाठी तब्बल 826 कोटींची जागा घेण्यात आली आहे ,जानेवारी 2025 पर्यंत हा मार्ग कार्यान्वित होईल असेही ते म्हणाले आहेत .
शेतक-यांसाठी फायद्याची शेतकरी समृद्धी ट्रेन
शेतक-यांचा माल बाजारपेठेत वेळेत पोहोचवण्यासाठी नाशिकपासून शेतकरी समृद्धी ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेसाठी पूर्वीच्या अनुभवांचा वापर करून दलालांना दूर ठेवत छोटे शेतकरी त्यांचा शेतमाल या ट्रेनद्वारे बाजारपेठेत पोहोचवू शकतात, असे वैष्णव यांनी नमूद केले.