राज्यात विधानसभा निवडणूकीसाठीचा प्रचार आज थांबणार आहे. बुधवारी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून शनिवारी मतमोजणी पार पडणार आहे. मात्र प्रचार थांबल्यानंतर विविध पक्षांकडून होणाऱ्या छुप्या प्रचारावर निवडणूक आयोगाचे लक्ष राहणार आहे.
‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात प्रचारादरम्यान घोषणा केली. आणि त्यापाठोपाठ राज्यातील प्रचाराची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला. मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या या दोन घोषणांभोवती प्रचाराची दिशा फिरू लागली.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या दोन घोषणांवरून भाजपवर हल्ला चढविला. भाजपला देशाचे तुकडे करायचे आहेत, अशी टीका विरोधकांनी केली.
तर महाविकास आघाडीवर वोट जिहादचा आरोप भाजप कडून करण्यात आला, जर मतदानासाठी तुम्ही वोट जिहाद करत असाल तर आम्ही पण मतांसाठी धर्मयुद्ध करण्यास तयार आहोत, असा इशारा भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभांचा सपाटा लावला. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंग यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात सहभागी झालेले दिसून आले.तर काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लीकार्जुन खरगे आदी नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येऊन पोचले होते.प्रचारात नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली, आश्वासनांची खैरात झालेली दिसून आली. शेवटच्या टप्प्यात नेतेमंडळींच्या हेलिकॉप्टर आणि गाड्यांची आणि बॅगांची निवडणूक आयोगाने केलेली तपासणी चर्चेचा विषय ठरली.
महायुतीने प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेवर पुरेपूर भर दिलेला दिसून आला. तर महाविकास आघाडीने जाहीरनाम्यांमध्ये आपले मुद्दे मांडत प्रचार केला. महायुती आणि महाविकास आघाडीचे संयुक्त जाहीरनामे जाहीर करण्यात आले. मात्र शिवसेने (शिंदे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षांनी आपले स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध केले नाहीत.