देशाची राजधानी दिल्लीमधले हवेचे प्रदूषण ‘गंभीर’ श्रेणीत पोचले आहे.वायुप्रदुषणामुळे घसरलेली हवेची गुणवत्ता आणि विषारी धुके यांमुळे आज व्यापून गेलेली पाहायला मिळाली. शहरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक या हंगामातील सर्वोच्च, म्हणजेच 481 वर पोहोचला. ज्यामुळे या हंगामातील प्रदूषणाची सर्वोच्च पातळी नोंदली गेली. शहरातील दृश्यमानता यामुळे कमी झाली असून नागरिकांनाही श्वसनाला त्रास होऊ लागल्याचे दिसून आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दरवर्षीप्रमाणे हिवाळा सुरू होताच दिल्लीत प्रदूषणाने विळखा घातला आहे. हवेची गुणवत्ता ढासळल्याने, अधिकाऱ्यांनी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनच्या स्टेज IV अंतर्गत प्रदूषणविरोधी (GRAP) कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने हे निर्बंध जाहीर केले आहेत.दरम्यान दिल्ली शहरातील प्रदुषण पातळीमुळे निर्माण झालेली समस्या निवारणासाठी शासन आणि प्रशासन सक्रीय झाले आहे.
दिल्ली विमानतळावर असलेल्या कमी दृश्यमानता असल्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यासाठी सज्ज असलेली विमाने इतर शहरांकडे वळवण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले आहे. यापूर्वी, गेल्या काही दिवसात वळवलेल्या उड्डाणांची संख्या पाच होती, परंतु आज ही संख्या नऊ झाली आहे. सूत्रांनुसार, आता जयपूरला वळवलेल्या फ्लाइटची संख्या आठ झाली आहे तर एक फ्लाइट डेहराडूनला वळवण्यात आली आहे.
‘गंभीर’ श्रेणीत गेलेल्या या प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. डिझेलवरील अवजड वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी या वाहनांना व हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून येणाऱ्या डिझेलवर चालणाऱ्या बसना दिल्लीच्या हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांसह बीएस-४ श्रेणीतील वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत, विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळी दिल्लीतील रस्त्यांवर वाहनांची संख्या कमी करण्यासाठी दिल्ली व केंद्र सरकार विविध उपाययोजना करत असल्याचे सांगण्यात आले आहे.