विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघात खळबळजनक घटना घडली आहे. जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर रविवारी रात्री धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. सात ते आठ जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संताजी घोरपडे प्रचार आटोपून आपल्या सहकाऱ्यांसह कोल्हापूरकडे परतत असताना मनवाड गावाजवळ काही लोकांनी त्यांची गाडी थांबवली. पक्षाचे कार्यकर्ते भेटायला थांबले असतील, असे गृहीत धरून घोरपडे गाडीतून उतरले. मात्र, टोळक्याने अचानक काठ्या, भाले आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात संताजी घोरपडे यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून डोक्यातून रक्त वाहत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली आणि नंतर शेतात पळ काढला.
या हल्ल्यानंतर संताजी घोरपडे आणि त्यांचे सहकारी कोल्हापूरमध्ये परतले व कळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हल्लेखोर कोण होते आणि हल्ल्यामागील हेतू काय, याचा तपास पोलीस करत आहेत.
करवीर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत असून संताजी घोरपडे हे प्रभावी उमेदवार मानले जात आहेत. या हल्ल्याचा राजकीय हेतू आहे का, यावर चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या हल्ल्यामुळे वातावरण चिघळले आहे.
पोलीस प्रशासनावर निवडणूक काळात शांतता राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.दरम्यान संताजी घोरपडे यांच्यावर झालेला हल्ला हा एक गंभीर प्रकार असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जनसुराज्य पक्षाने केली आहे.
दरम्यान प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असताना जळगाव जिल्ह्यातूनही अशी एक बातमी समोर आली आहे. अपक्ष उमेदवार उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम यांच्या घरावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे.