झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील 38 जागांवर 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल तिथल्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत . झारखंडच्या 43 जागांवर 13 नोव्हेंबरला मतदान झाले होते. आता उर्वरित 12 जिल्ह्यातील 38 जागांसाठी होणाऱ्या मतदानासाठी भाजप, काँग्रेस, झामुमो या प्रमुख पक्षांसह इतर सर्व पक्षांनी आपापली शक्ती पणाला लावली आहे .
भाजपकडून 32 उमेदवार, बसपा 24,झारखंड मुक्ती मोर्चा 20,कॉंग्रेस 12 तर राजदचे 2 उमेदवार रिंगणात आहेत. झारखंडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा बहुतांश भाग हा आदिवासीबहुल आहे. या भागावर सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे चांगलेच वर्चस्व असल्याचे मानले जाते. मात्र, यावेळेस भाजपने झामुमोचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, शिवराजसिंह चौहान या केंद्रीय नेत्यांसह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जोर लावला. काँग्रेसकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी प्रचार केला. तर झामुमोकडून माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्या जास्तीत जास्त प्रचारसभा झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात झामुमोचे नेते, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कल्पना सोरेन, बसंत सोरेन, महुआ माजी तर काँग्रेसकडून मंत्री इरफान अन्सारी, रामेश्वर ओरआन आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन, सीता सोरेन, बाबूलाल मरांडी, गीता कोडा, सुनील सोरेन हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.