नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा (विशेष) शुभारंभ नागपूर रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात काल झाला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, अ. भा. सह सेवाप्रमुख तसेच वर्गाचे पालक अधिकारी राजकुमार मटाले, जोधपूर प्रांत संघचालक तसेच वर्ग सर्वाधिकारी हरदयाल वर्मा यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले. याप्रसंगी सह सरकार्यवाह मुकुंद, रामदत्त हेही उपस्थित होते.
यंदाच्या वर्गात देशभरातून आलेले एकूण ८६८ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. ४० वर्षांवरील प्रशिक्षणार्थींच्या या २५ दिवसांच्या वर्गाचा समारोप १२ डिसेंबरला होणार आहे . या प्रशिक्षण वर्गात समाज जागरण आणि सामाजिक परिवर्तनयाबाबत प्रशिक्षण देण्यात येते. देशभरातून शिक्षार्थींना राजकुमार मटाले यांनी संबोधित केले.ते म्हणाले की, “डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजींच्या तपोभूमीत सुरू झालेला हा विशेष वर्ग ऐतिहासिक आहे. संघ शिक्षा वर्गाच्या नव्या रचनेनुसार पहिल्यांदाच हा विशेष वर्ग होत आहे. हा वर्ग राष्ट्रीय एकात्मतेची आणि सहजीवनाची अनुभूती देणारा आहे”.
संघ कार्यात प्रशिक्षण वर्गाला खूप महत्त्व असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, जसजसे काम वाढत गेले तसतसे विविध प्रांतांमध्ये प्रशिक्षण वर्ग घेण्यास सुरुवात झाली. संघ स्थापना १९२५ मध्ये झाली असून प्रशिक्षण वर्ग पहिल्यांदा १९२७ मध्ये सुरू झाले. तेव्हा १७ जणांनी प्रशिक्षण घेतले होते. बंदीचा काळ आणि कोरोनाचा काळ वगळता संघाचे प्रशिक्षण वर्ग कधीही खंडीत झाले नाहीत. काळानुरूप प्रशिक्षण वर्गाचा कालावधी आणि अभ्यासक्रम यात बदल करण्यात आला. कार्यकर्त्याची विचारसरणी, भूमिका, कार्यपद्धतीची स्पष्टता, बांधिलकी आजच्या दृष्टीकोनात कशी असावी, त्याच्यासमोरील आव्हाने स्वीकारून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आदर्श यात मांडण्यात येतो.
डॉ. हेडगेवारांनी मोहिते शाखा येथून सुरू केलेल्या संघाचे कार्य आज देशव्यापी असल्याची भावना पालक अधिकारी राजकुमार मटाले यांनी व्यक्त केली, ते पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही पवित्र, प्रामाणिक कार्याच्या सुरुवातीला उपेक्षा, उपहास, विरोध होतो. त्यानंतर त्याला स्वीकृती मिळत असते. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळात संघकार्याची हेटाळणी व्हायची, उपहास उडविला जायचा. आज संघाला सर्वदूर स्वीकार्यता मिळाली आहे. अगदी सार्वजनिकरित्या संघकार्याला विरोध करणारेदेखील एकांतात या कार्याचे कौतुक करतात. समाज जागरणाच्या पंच परिवर्तनासाठी निर्धारित विषयांच्या क्रियान्वयनासाठी क्षमता वाढावी, राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला गती मिळायला हवी, असे राजकुमार मटाले त्यांच्या संबोधनात म्हणाले.