राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना नाट्यमय घडामोडीना वेग आला आहे. क्षितीज ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे . मुंबईच्या विरार परिसरातील हॉटेल विवांतामध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी आज तावडेंना याप्रकरणी घेराव घातला होता. तसेच बविआने तावडेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. दरम्यान तावडेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावत सीसीटीव्ही फुटेज तपासून आपली निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
बहुजन विकास आघाडीने केलेल्या आरोपानुसार आज मंगळवारी विनोद तावडेही विरार येथील मनोरीपाडा येथील हॉटेल विवांत येथे आले होते. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे उमेदवार राजन नाईक व काही पदाधिकारी होते. त्यांच्यात बैठक सुरू असतांना बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्तेही थेट या हॉटेलमध्ये घुसले. यावेळी तावडे हे पैसे वाटत असून तब्बल 5 कोटी रुपयांचे वाटप झाल्याचा आरोप बविआने केला आहे. दरम्यान, या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रोखले. यामुळे दोन्ही गटात तुफान राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
बहुजन विकास आघाडीचे नेते हिंतेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. मात्र, तावडेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत . तसेच माध्यमांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले आहेत की. मी वाटेत येत असताना नालासोपारा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची बैठक सुरु होती. त्याठिकाणी निवडणूकीच्या दिवशीच्या प्रक्रियांबाबत १२ गोष्टी सांगण्यासाठी मी इथे पोहोचलो होतो. परंतू, विरोधी पक्षातील हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांना आम्ही पैसे वाटप करत असल्याचे वाटले. त्यानंतर निवडणूक आयोगाने माझी गाडी आणि रुम तपासली. पोलिस आणि निवडणूक आयोग याबाबत पुढील तपास करत आहेत
तसेच मी ४० वर्षांपासून पक्षात आहे. मी कधीच निवडणूकीत पैसे वाटले नाही. त्यामुळे कुणीही काहीही आरोप केले तरी विनोद तावडे काय आहे, हे सगळ्यांना माहित आहे. आणि वास्तव काय आहे तेदेखील सर्वांना माहित आहे.मात्र निवडणूक आयोगाने निष्पक्ष पद्धतीने चौकशी करायला हवी अशी विनोद तावडे यांनी मागणी केली आहे.