विधानसभा निवडणुकीत काल राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचे चित्र समोर आले आहे. अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचे चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळाले. गाव व खेड्यांमधील मतदार जास्त जागरूक असल्याचे आढळून आले तर उलट त्या तुलनेत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी भागांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला. रात्री ११.४५ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.११ टक्के मतदान झाले असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोल्हापूरात सर्वाधिक मतदानाची नोंद करण्यात आली आहे. तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झालेले दिसून आले. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान झाले. संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 76.25 टक्के इतके मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान करवीरमध्ये झाले तर सर्वात कमी इचलकरंजीमध्ये झाले आहे.
मुंबई शहराच्या तुलनेने मुंबई उपनगरात मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला. जवळपास सर्व उपनगरांमधील विधानसभा मतदारसंघांमध्ये 50% पेक्षा जास्त मतदान झाले. भांडुप पश्चिम या विधानसभेत सर्वाधिक 61.12 टक्के मतदान झाले तर सर्वात कमी मतदान वर्सोवा या विधानसभेत 51.2% मतदान झाले आहे.
2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा 2024 निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या मतदान टक्केवारीत वाढ झाली आहे. महिलांचा उत्साह लक्षवेधी असल्याचे दिसून आले .त्यामुळे महिलांच्या वाढत्या मतदानाचा फायदा कोणाला असा सवाल आता उपस्थित होत आहे. तर पुरुषांच्या मतदानात एकूण तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मतदानाचा टक्का ७० टक्क्यांहून अधिक असल्याचे समोर आले आहे.अनेक ठिकाणी सायंकाळपर्यंत रांगा होत्या. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरमधील विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा टक्का वाढला असलयाचे समॊर आले.
पुणे जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान झाले आहे. शहरी भागातील ८ मतदारसंघांत ५४ टक्के मतदान झाले आहे.तर सर्वाधिक ७६.९३ टक्के मतदान इंदापूर तालुक्यात झाले आहे. त्याखालोखाल बारामती आणि मावळ मतदारसंघात ७२ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे .