अमेरिकेतील न्यूयॉर्क फेडरल कोर्टाकडून अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि अन्य सहा जणांवर अब्जावधी डॉलर्सच्या फसवणुकीसह लाचखोरीचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात भारतातील सौर ऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना तब्बल २,११० कोटी रुपये (२५० दशलक्ष डॉलर्स) लाच दिल्याचा आरोप आहे.अमेरिकेमधील कोर्टाने त्यांच्याविरोधात खटला दाखल करुन घेतला असून गौतम अदानी यांच्यासह त्यांचा पुतण्या सागर अदानी यांना अटक वॉरंट बजावले आहे.
सागर अदानी हे २०१५ मध्ये ब्राउन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र पदवी घेतल्यानंतर अदानी समूहात सामील झाले. त्यांनी समूहाचा ऊर्जा विभाग आणि विशेषतः अदानी ग्रीन एनर्जीचे सौर व पवन ऊर्जा पोर्टफोलिओ तयार करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. २०३० पर्यंत जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क उभारण्याच्या उद्दिष्टावर सागर अदानी काम करत आहेत.
फेडरल कोर्टातील तक्रारीनुसार, गौतम अदानी व सागर अदानी यांनी अन्य आरोपींसह भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्पांचे कंत्राट मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाच दिली. यासोबतच गुंतवणूकदारांची दिशाभूल करत अब्जावधींचा निधी जमा केल्याचा आरोप आहे. यामध्ये अमेरिकेतील एमईसी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून प्रकल्पासाठी लाच दिली गेली का, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे अदानी समूहाच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. विशेषतः अदानी ग्रीन एनर्जीच्या सौर प्रकल्पांसाठी दिलेल्या लाचेचे आरोप भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक ठरले आहेत. या गंभीर आरोपांमुळे अदानी समूहाला मोठ्या आंतरराष्ट्रीय कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
या सर्व प्रकरणाबाबत अदानी समूहाकडून हे आरोप निराधार असल्याची प्रतिक्रिया आली आहे. यानंतर मात्र अदानी समूहावर विपरीत परिणाम झाला असून त्यांचे शेअर्स चांगलेच गडगडले आहेत.