कॅनडाच्या सरकारने उशिरा का होईना पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात आपल्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे कबुली दिली आहे . कॅनडाच्या पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागार, नॅथली जी ड्रॉइन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने पंतप्रधान मोदी,परराष्ट्र मंत्री एस जयशंकर किंवा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा कॅनडातील गंभीर गुन्हेगारी कृतीशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालील कॅनडाच्या सरकारने शुक्रवारी सर्वोच्च भारतीय नेत्यांना कॅनडामधील गुन्हेगारी कारवायांशी जोडणारा आपल्या माध्यमांनी प्रसिद्ध केलेला अहवाल नाकारत तो चुकीचा असल्याचे कबूल केले आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या मृत्यूचा पंतप्रधान मोदी, एस जयशंकर आणि अजित डोवाल यांच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॅनडास्थित ग्लोब अँड मेल या वृत्तपत्रातील वृत्ताचे भारताने जोरदार खंडन करत कॅनडाला फटकारले होते.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या अहवालावर टीका करत म्हंटले होते की, अशा हास्यास्पद विधानांमुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या दोन्ही देशांतील परस्पर संबंधाचे नुकसान होत आहे.
उलट भारताने कॅनडातील अतिरेकी, हिंसाचार आणि भारतविरोधी कारवायांबद्दल वारंवार तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि कॅनडाच्या अधिकाऱ्यांना या कारवायांवर कारवाई करण्यास सुचवले आहे.
गेल्या वर्षी कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता.त्यानंतर भारताने सर्व आरोप फेटाळून लावत कॅनडाने त्यांच्या देशात अतिरेकी आणि भारतविरोधी घटकांना जागा दिल्याचा आरोप केला होता.