Maharashtra Assembly Elections : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी असून निवडणुकीचा निकाल जाहीर व्हायची वेळ उद्यावर येऊन ठेपली आहे. जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनुसार, युती किंवा आघाडीला सत्ता स्थापन करण्यास अपक्ष किंवा लहान पक्षांची गरज घ्यावी लागणार आहे. असे समोर आल्यामुळे अपक्ष आमदारांची जुळवाजुळवही करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी जर उद्या वंचित बहुजन आघाडीला संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करु शकणाऱ्या पक्षासोबत राहणे पसंत करणार आहोत, अशी भूमिका घेत आंबेडकरांनी ट्विटमधून आपले मत व्यक्त केले आहे.
वंचित बहुजन आघाडी या वेळी अनेक ठिकाणी जिंकण्याच्या स्थितीत आहे असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी आता सत्तेत जाण्याचे संकेत दिले आहेत.आपला पक्ष राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा आवाज बनेल, असा दावा पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
वंचित विकासने विधानसभा निवडणुकीत 200 उमेदवार उभे केले होते. तर 2019 च्या निवडणुकीत पक्षाने 236 जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने महाविकास आघाडीशी हातमिळवणी न करता स्वतंत्र्यपणे लोकसभा आणि विधानसभा लढवली आहे.तर ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज वर्तवला आहे.