विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी मविआ आणि महायुतीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. छोट्या घटकपक्ष आणि नेत्यांशी महायुतीकडून संपर्काला सुरवात झाली आहे.बहुजन विकास आघाडी, मनसे, प्रहार जनशक्ती आणि इतर पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.
विधानसभेच्या निकालापूर्वी सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आला असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. यात महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पराग शाह, मिहिर कोटेचा, कालिदास कोळंबकर, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे या बैठकीत मनसेचे नेते आणि उमेदवार बाळा नांदगावकरही सहभागी झाले आहेत.
राज्यात भाजप आणि महायुतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास पुढील रणनीती काय असू शकेल यासाठीचा प्लॅन बी देखील तयार ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची ऑनलाइन बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केले आहे.
तर मराठवाड्यातील काही अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.विजयी होणाऱ्या अपक्ष आमदारांशी महायुती, मविआकडून संपर्क करण्यात आला आहे.
तर शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक उमेदवार नाराज आहेत कारण भाजपने त्यांच्या मतदारसंघात अपक्षांना मदत केली, त्यामुळे असे नाराज उमेदवार आमच्या संपर्कात आहेत असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. शक्यतो उद्या संध्याकाळी आम्ही सत्तास्थापनेचा प्रयत्न करणार आहोत. वेळ कमी असल्यामुळे सगळ्या आमदारांनी बोलावण्यासाठी आणि लवकरात लवकर आण्यासाठी फ्लाईट आणि इतर सगळी जुळवाजुळव करावी लागणार आहे. पण आम्हालाच बहुमत मिळेल आणि आम्ही अपक्ष उमेदवारांसह बंडखोरांच्या देखील संपर्कात आहोत.असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.