भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. निवडणुकीत पैसे वाटल्याचे खोटे आरोप करून बदनामी केल्या प्रकरणी बिनशर्त माफी मागावी अन्यता कायदेशीर कारवाईस सामोरे जावे असा इशारा या नोटीशीच्या माध्यमातून दिल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात तावडे म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला (19 नोव्हेंबर रोजी) मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे यांनी माझ्या बाबतीत यांना मतदारांना 5 कोटी रुपये वाटताना रंगेहाथ पकडल्याचे आरोप आणि इतर नाट्यमय विधाने केली होती. काँग्रेसच्या नेत्यांना फक्त माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी करायची होती, असे विनोद तावडे म्हणाले आहेत .
मी एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे, मी गेली 40 वर्षे राजकारणात आहे, पण मी असे काहीही केले नाही. काँग्रेसच्या नेत्यांना माझी, पक्षाची आणि माझ्या नेत्यांची बदनामी करायची होती, म्हणून त्यांनी हे प्रसार माध्यमांपुढे आणि लोकांसमोर खोटी विधाने केली आहेत . याप्रकारामुळे आपण दुखावले असल्याने काँग्रेस नेत्यांना न्यायालयाची नोटीस बजावून जाहीरपणे माफी मागावी किंवा कारवाईला सामोरे जावे असा इशारा दिल्याचे तावडे यांनी सांगितले आहे .