महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येण्यास सुरवात झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यात २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचे प्रमाण वाढले आहे त्यांचा कोणाला फायदा होणार हे आता लवकरच समोर येणार आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे.
महायुतीमधील भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांना एक्झिट पोल्समध्ये मविआपेक्षा अधिक जागा दाखविल्या गेल्या आहेत. तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांना महायुतीपेक्षा थोड्या कमी जागा दाखविल्या गेल्या. अपक्ष, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचीही कामगिरी कशी असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
पोस्टल मतांची मोजणी सध्या पार पडली असून महायुती 123 तर महाविकास आघाडीचे 100 उमेदवार आघाडीवर आहेत. तर इतर 11 उमेदवार आघाडीवर आहेत.
महाराष्ट्रात मुख्यतः. महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना असणार आहे. कारण सत्तेत भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) असे तीन पक्ष आहेत. तर विरोधात म्हणजेच महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) असे तीन पक्ष समोर आहेत. यावेळी सहा प्रमुख पक्ष लढतीत आहेत. शिवाय मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि तिसरी आघाडीही मैदानात आहेत. अनेक अपक्ष आणि बंडखोरही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निकाल लागताना १९९५ सारखी परिस्थिती येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंनी सरकार आम्ही स्थापन करणार असा दावा केला आहे.त्यामुळे ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे.