विधानसभेच्या मतमोजणी दरम्यान महायुतीचा विजय जवळपास नक्की झाला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील अनेक जेष्ठ नेत्यांचा पराभव होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मधून पराभव झाला आहे.बाळासाहेब थोरात यांनी आत्तापर्यंत आठवेळा निवडणूक लढवली होती आणि ते एकदाही हरले नव्हते. मात्र आता नवव्या वेळी त्यांचा पराभव झाला असल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास ते मुख्यमंत्रिपदाचेही प्रमुख दावेदारही मानले जात होते.पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे शिवसेनेचे अमोल खताळ यावेळी जायंट किलर ठरले.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या विरोधात भाजपाचे अतुल भोसले निवडणूक लढवित होते. अतुल भोसले मतमोजणी सुरु झाल्यापासून सुरुवातीपासून आघाडीवर होते. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात कायम कॉंग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. येथून सात वेळा कॉंग्रेसचा विजय झालेला होता.त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव हा मोठा धक्का समजला जात आहे.
लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे धीरज देशमुख तर लातूर शहरमधून अमित देशमुख पिछाडीवर आहेत या दोन्ही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. हे दोघेही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत.
असे काहीसे चित्र काँग्रेसच्या फायरब्रॅण्ड नेत्या यशोमती ठाकूर यांच्या बाबतीत दिसत आहे. तिवसा मतदारसंघातून त्या पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे. साकोली येथून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यातही अटीतटीची लढाई चालू असल्याचे चित्र आहे.