Worli Assembly Constituency : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून, राज्यात पुन्हा एका एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. सध्या महाराष्ट्रात 224 जागांवर महायुती आघाडीवर आहे. त्यापैकी 130 जागांवर भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 52 जागा मिळताना दिसत आहेत.
या निवडणुकीत महविकास आघाडीचा पूर्णपणे सुपडासाफ झाला आहे. मात्र, असे असले तरी शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा विजय झाला आहे. आदित्य ठाकरेंना येथून जवळपास १० हजार मतांनीच विजय मिळाला आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आदित्य ठाकरे, शिवसेनेचे (शिंदे) मिलिंद देवरा, मनसेचे संदीप देशपांडे हे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात होते. या तिरंगी लढतीत मात्र, आदित्य ठाकरेंनी विजय मिळवला आहे.
वरळी परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मुंबई महानरपालिका निवडणुकीत वरळी विभागातील सर्व प्रभागांमधून शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. तसेच पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेतृत्त्व अशी ओळख असलेले सचिन अहिर हेही शिवसेनेत दाखल झाल्यामुळे वरळी शिवसेनेचा अभेद्य गड बनला होता. तसंच, आता दोन टर्म आदित्य ठाकरेंनी हा गड राखला आहे. १९९० पासून या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचाच वरचष्मा आहे. या मतदारसंघात गणपतराव नलावडे हे आमदार म्हणून निवडून आले होते त्या दिवसापासून २०२४ पर्यंत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनाच (उबाठा) आमदार निवडून येत असल्याचं दिसून येतं.