संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार असून त्यामध्ये वक्फ कायदा (दुरुस्ती) विधेयकासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तर 20 डिसेंबरला अधिवेशनाचा समारोप होणार आहे. सरकारने या अधिवेशनासाठी १६ विधेयके सज्ज ठेवली आहेत.त्यापैकी 11 विधेयके चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहेत. तर 5 कायदे होण्यासाठी मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
प्रस्तावना, विचार आणि पास करण्यासाठी सूचीबद्ध असलेल्या इतर विधेयकांमध्ये मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक, भारतीय वायुयान विधायक, आपत्ती व्यवस्थापन (दुरुस्ती) विधेयक, गोवा राज्याच्या विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधीत्वाचे पुनर्संयोजन विधेयक, द बिल्स ऑफ लॅडिंग बिल, द कॅरेज ऑफ गुड्स बाय सी बिल, द रेल्वे (दुरुस्ती) विधेयक, बँकिंग कायदे (दुरुस्ती) विधेयक आणि तेलक्षेत्र (नियमन आणि विकास) दुरुस्ती विधेयक.
बॉयलर विधेयक, राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ विधेयक, पंजाब न्यायालये (सुधारणा) विधेयक, व्यापारी शिपिंग विधेयक, कोस्टल शिपिंग विधेयक आणि भारतीय बंदरे विधेयक यांचाही या यादीत समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर, रविवारी संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी बोलावलेल्या बैठकीत विरोधकांनी मणिपूर हिंसाचार, उत्तर भारतातील प्रदूषण आणि रेल्वे अपघात आदी विषयांवरही चर्चेची मागणी केली आहे. तसेच अदानी उद्योग समूहावरील अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपांचा मुद्दा त्यांनी लावून धरला आहे . तसेच लोकसभेत पहिल्याच दिवशी काँग्रेससह विरोधकांनी अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी केली आहे .संरक्षणमंत्री राजनाथसिंह या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
किरेन रिजिजू यांनी संसदेचे अधिवेशन सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार “कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार आहे” असे प्रतिपादन केले आहे .
ते पुढे म्हणाले आहेत की , “सरकार कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र आमची एकच विनंती आहे की सभागृह चांगले चालले पाहिजे आणि कोणताही गदारोळ होऊ नये. प्रत्येक सदस्याला चर्चेत सहभागी व्हायचे आहे, परंतु सभागृह चांगले चालले पाहिजे. हिवाळी अधिवेशन चालवण्यासाठी बरं, सर्वांच्या सहकार्याची गरज आहे आणि सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.”
यातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.