उत्तर प्रदेशातील संभल येथील शाही जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर हिंदूच्या बाजूने सर्वेक्षणासाठी न्यायालयात दाद मागितली होती, न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करत सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.सर्वेक्षणावरून झालेल्या वादाला काल हिंसक वळण लागले. संभलमध्ये मशिदीच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या शेकडो आंदोलकांची पोलिसांशी चकमक झाली. या प्रकरणी 21 जणांना अटक करण्यात आली असून 400 हून अधिक लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत शाळाही बंद राहणार आहेत. बाहेरील व्यक्तींना जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी परिसरात तळ ठोकून आहेत. एकूण वातावरणाचा विचार करता आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार शाही जामा मशिदीचे सर्वेक्षण सुरु आहे. रविवारी सकाळी पाहणी करण्यासाठी पथक पोलिसांसह आले असता जमावाने विरोध करत दगडफेक केली होती. यावेळी अनेक वाहने जाळण्यात आली आणि गोळीबार करण्यात आला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक पोलिस जखमी झाले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत. बिघडलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जवळपासच्या जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा आणि लाठीचार्ज करावा लागला.
या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांच्याशी बोलून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आणि बेशिस्त घटकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर प्रशासनाने तातडीने बिघडलेले वातावरण शांत केले.
येथे आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनवर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी २१ जणांना अटक केली असून ४०० हून अधिक लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. इंटरनेट सेवा २४ तासांसाठी बंद करण्यात आली आहे. नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शाळा बंद होत्या. संपूर्ण जिल्ह्यात अघोषित संचारबंदीसारखे वातावरण आहे.
डीजीपींनी याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पीएसीच्या चार आणि आरएएफची एक कंपनी संभळला पाठवण्यात आली होती. दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आयजी रेंज मुरादाबाद रमित शर्मा संभलमध्ये तळ ठोकून आहेत. पोलिस अधीक्षक कृष्ण कुमार यांनी सांगितले की, आरोपींवर गुंडगिरीसाठी कारवाई केली जाणार आहे.