शरद पवार यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतली, अभ्यास करून त्यांनी माझ्याविरुद्ध उमेदवार दिला. मात्र, आमचे मित्र जरांगे, त्यांनी तर सांगितले होते की, निवडणुकीमध्ये मी पडणार नाही, बोलणार. पण, प्रचार संपण्याच्या आदल्यादिवशी सकाळी दहापासून रात्री दोनपर्यंत हाताला सलाईन आणि मी पाहा आजारी आहे. आता, माझे काहीही होईल, आपल्या समाजाची जी लेकरंबाळं आहेत, काहीतरी करा, ज्यांनी विरोध केला त्यांना पाडा, असेही सगळे सांगितले. माझ्या मताधिक्यावर त्याचा परिणाम झाला, परंतु इतर अल्पसंख्याक समाज एकत्र आला आणि त्यांनी आमचे तारू किनाऱ्याला लावले , अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना थेट नाव घेऊन मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी तुम्हाला ज्याला निवडून द्यायचंय ते द्या, ज्याला पाडायचंय ते पाडा, अशा शब्दांत मराठा समाजाला आवाहन केलं होतं. मात्र, निवडणूक प्रचाराची मुदत संपत असताना त्यांनी येवल्यात जाऊन सांत्वन दौरा केला होता. या दौऱ्यावेळी मराठा समाज बांधवांशी बोलताना त्यांनी इथं दोघांना पाडा असं आवाहनही केलं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत येथून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ विजयी झाले आहेत. त्यामुळे, आपल्या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना त्यांनी थेट मनोज जरांगे यांचे नाव घेऊन टोला लगावला. जनादेशामधून हे स्पष्ट झालेय की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच आहे. कायद्याच्या दृष्टीनेही हा प्रश्न सुटला असून, निवडून आलेल्या आमदारांच्या कौलामुळे राष्ट्रवादीबाबत आता लोकांमध्ये संभ्रम राहिलेला नसल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.