उद्या दिनांक २६ नोव्हेंबर रोजी राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज होणार नाही. कारण त्यादिवशी संविधान सभेने संविधान स्वीकारले, त्याचे ७५ वे वर्ष आहे. यापार्श्वभूमीवर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१५ पासून देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून सातत्याने संविधान दिन साजरा करण्यात येतो. यावर्षीही ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने दिल्लीपासून संपूर्ण देशात हा दिन साजरा करण्यात येणार आहे.
संविधान सभागृहात दोन्ही सभागृहातील सदस्य एकत्रित असतील. यादिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सदस्यांना मार्गदर्शन करतील. संविधान दिवशी काही महत्वाची कागदपत्रे पुस्तकातून प्रकाशित केली जातील. संविधान निर्मितीआधी काय-काय प्रक्रिया झाली होती, यांसह अनेक गोष्टींची माहिती यात असेल. हे सामान्य पुस्तक नाही. पुस्तकामध्ये असलेली चित्र, त्याचे वर्णन, मुलभूत संकल्पना, त्याची माहिती देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संविधान सभेच्या सेंट्रल हॉलमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संबोधित करणार आहेत.
यावेळी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, संसद सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्षही दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संबोधित करतील. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला स्वागतपर भाषण करणार आहेत.
यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या इतर कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
(i) भारतीय संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त स्मरणार्थी नाणे आणि टपाल तिकीटाचे प्रकाशन.
(ii) “मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया: एक झलक” आणि “मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आणि त्याचा गौरवशाली प्रवास” या पुस्तकांचे प्रकाशन.
(iii) भारतीय राज्यघटनेच्या कलेला समर्पित पुस्तिकेचे प्रकाशन.
(iv) भारतीय राज्यघटनेचे संस्कृतमध्ये प्रकाशन.
(v) मैथिलीमध्ये भारतीय राज्यघटनेचे प्रकाशन.
तसेच यावेळी भारतीय राज्यघटनेचा महिमा, त्याची निर्मिती आणि त्याचा ऐतिहासिक प्रवास दाखविणारी लघुपट दाखविण्यात येणार आहे.
.