राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती झाली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना त्यांना पदावरून हटवण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले होते. विरोधी पक्षातील नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्याविरोधाता निवडणूक आयोगाने तक्रार दाखल केली होती. रश्मी शुक्ला यांच्या जागी संजय कुमार यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. मात्र आता निवडणूका झाल्यावर महायुती सरकार येणार हे निश्चित झाल्यावर आता पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमवारी रात्री राज्य सरकारकडून त्याबाबतचा शासन आदेश काढण्यात आला आहे . तसेच आजच सकाळी शुक्ला पदभार स्वीकारणार आहेत.अशी माहिती समोर येत आहे.शनिवारी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली होती. सोमवारी रात्री गृह विभागाने शासन आदेश जारी करत त्यांची पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती करत असल्याचे स्पष्ट केले आहे .
महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. त्यांनी सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्रप्रमुख म्हणूनही काम केले आहे. याशिवाय त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लाचे नाव चर्चेत होते. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. त्याचीही चौकशी करण्यात आली होती. रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या आणि एकनिष्ठ असल्याचे सांगितले जाते. मात्र घाईघाईने करण्यात आलेल्या या रश्मी शुक्ला यांच्या फेरनियुक्तीबाबत महायुतीतील नेत्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागू शकते.