बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निदर्शने करणारे प्रमुख साधू चिन्मय प्रभू उर्फ कृष्णा दास प्रभू यांच्या अटकेनंतर तेथील परिस्थिती बिघडत चालली आहे. चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात हिंदू समाज रस्त्यावर उतरला असून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे.
ढाका आणि बांगलादेशच्या इतर भागांमध्ये हिंदू समाजाने चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात निदर्शने सुरू केल्यानंतर अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर अनेक लोक जखमी झाले आहेत. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निदर्शने करणारे प्रमुख साधू चिन्मय प्रभू यांना ढाका पोलिसांच्या डिटेक्टीव्ह ब्रँचने सोमवारी (२५ नोव्हेंबर) ढाका विमानतळावर अटक केली होती. यानंतर ढाका, चितगाव आणि इतर भागांमध्ये चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत.
चिन्मय कृष्ण दास प्रभू ढाकाहून चितगावला जाण्यासाठी सोमवारी हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. यावेळी त्यांना अटक करण्यात आली आहे. चिन्मय प्रभू यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अनेक मोर्चे काढले आहेत. या रॅलींमध्ये त्यांनी हंगामी सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला होता.
दरम्यान,भाजप खासदार सुकांता मजुमदार यांनी चिन्मय कृष्ण प्रभू यांच्या अटकेचा निषेध केला आहे तसेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीची पावले उचलत यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे .
चिन्मय प्रभू हे बांगलादेशातील सनातन जागरण मंचचे प्रवक्ते म्हणूनही कार्यरत आहेत. बांगलादेशात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी ३० ऑक्टोबर रोजी चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्यासह १९ जणांवर देशद्रोह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चिन्मय प्रभू यांनी शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रंगपूर येथे निघालेल्या मोठ्या निषेध रॅलीला संबोधित केले होते. 25 ऑक्टोबर रोजी लालदिग्गी रॅलीच्या दिवशी भगवा रंगाचा धार्मिक ध्वज फडकवण्यात आला होता. ध्वजाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भगवा ध्वज काढण्यात आला. आरोपपत्रात ब्रह्मचारी आणि इतरांवर राष्ट्रध्वजाचा अवमान करून देशद्रोह केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.