विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीची आता नाचता येईना ,अंगण वाकडे अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे आता हे पराभवाचे खापर महाविकास आघाडी ईव्हीएम मशिन्सच्या वापरावर फोडायला सज्ज झाली आहे.
महाविकास आघाडीचा झालेला पराभव अजूनही आघाडीच्या नेत्यांच्या पचनी पडत नसल्याचे दिसत आहे. त्यातून पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएममुळेच गोंधळ झाला आहे असे मत मांडत ईव्हीएम विरोधात मोठ्या आंदोलनाची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे. नुकत्याच मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांसोबत चर्चा केली. बैठकीत ईव्हीएम गोंधळाविरोधात व्यापक आंदोलन करण्याची भूमिका मांडली गेली. उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी सर्व पराभूत उमेदवारांना जिथे मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाला, त्या ठिकाणी व्हीव्हीपॅट तपासणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. किमान ५% व्हीव्हीपॅट मतांची मोजणी केली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे .
दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसनेही कायदेशीर लढाईची तयारी सुरू केली आहे. शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेत झालेल्या त्रुटींचे पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी राज्य व केंद्र स्तरावर वकिलांची टीम तयार करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएम घोटाळ्याविरोधात एकत्र येऊन आंदोलन उभारणार असल्याचे स्पष्ट संकेत देत आहेत. “लढाई आता निर्णायक असेल, मागे हटायचे नाही,” असा स्पष्ट संदेश शरद पवारांनी दिला आहे.
राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ काढली होती. तशी आता ‘ईव्हीएम छोडो’ यात्रा काँग्रेसकडून काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.