पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद गेले काही दिवस युद्धाचे मैदान बनली आहे.सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक आणि पाकिस्तानच्या लष्करात जोरदार संघर्ष सुरु आहे.याबाबत आता इम्रान खानचा पक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने आपल्यावर होत असलेल्या कारवाईचे वर्णन “क्रूर, फॅसिस्ट लष्करी राजवटीतील नरसंहार असे करत यासाठी पाकिस्तानी लष्कराला जबाबदार धरले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने आरोप केला आहे की, सरकारच्या सुरक्षा दलांनी इस्लामाबादमधील आपल्या शांततापूर्ण निदर्शकांवर त्यांच्या रॅलीदरम्यान हल्ला केला आहे .
एक्सवरील पोस्टमध्ये पीटीआयने म्हटले आहे की, “पाकिस्तानमध्ये क्रूर, फॅसिस्ट लष्करी राजवटी आणि पीएमएलएनच्या बेकायदेशीर सरकारच्या नेतृत्वाखाली सुरक्षा दलांच्या हातून हत्याकांड घडले आहे. ज्यामुळे देश रक्तात बुडत आहे.”
“आज, सशस्त्र सुरक्षा दलांनी इस्लामाबादमधील शांततापूर्ण पीटीआय निदर्शकांवर हिंसक हल्ला सुरू केला, शक्य तितक्या लोकांना ठार मारण्याच्या उद्देशाने थेट गोळीबार केला. अनेक नागरिकांची हत्या करण्यासाठी स्नायपरचा देखील वापर करण्यात आला. यावेळी असंख्य मृत्यू आणि जखमी झाले आहेत. इम्रान खान यांना जीवे मारण्याची धमकी आणि नंतर कत्तल केलेल्या निरपराधांच्या मृत्यूनंतर “विजयाची” घोषणा हा शासनाच्या अमानुषतेचा पुरेसा पुरावा आहे,”असे आपल्या निवेदनात पक्षाने म्हंटले आहे.
“जगाने या अत्याचाराचा आणि पाकिस्तानमधील लोकशाही आणि मानवतेच्या ऱ्हासाचा निषेध केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या क्रूर क्रॅकडाऊनविरोधात कठोर भूमिका घेतली पाहिजे,” असे त्यात म्हटले आहे.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या निदर्शने, त्यांचे नेते इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी होत असलेल्या निदर्शनांनी , मंगळवारी हिंसक वळण घेतले, परिणामी चार सुरक्षा कर्मचारी आणि दोन पीटीआय समर्थकांचा मृत्यू झाला, असे वृत्त समोर आहे.
इस्लामाबादच्या डी-चौकात पोहोचल्यावर पीटीआयच्या निदर्शकांना तीव्र अश्रुधुराच्या नळकांड्या लागल्या, त्यानंतर निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी “निदर्शकांनी केलेला हल्ला” असा त्यांचा निषेध केला, तर गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी चकमकीत किमान चार सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची माहिती दिली, असे डॉन या वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.दरम्यान, पीटीआयने आरोप केला की सुरक्षा कर्मचाऱ्यांनी निदर्शकांवर थेट गोळीबार केला, ज्यात दोन ठार आणि चार जण जखमी झाले.
इस्लामाबादमध्ये पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या निदर्शकांनी रेंजर्स आणि पोलिस अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करत पंतप्रधान शरीफ यांनी या घटनेला जबाबदार असलेल्यांची तात्काळ ओळख पटवत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.