अदानी समूहावरील कथित आरोप आणि उत्तरप्रदेशच्या संभल येथील हिंसाचार प्रकरणावरून आज, बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. यावरून संसदेचे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्यामुळे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी (25 नोव्हेंबर रोजी) सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच विरोधकांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी अदानी प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडून चर्चेची मागणी केली. राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नियम 267 अंतर्गत अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी केली. मात्र, अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत गुन्हा दाखल झाला असून त्यावर सभागृहात चर्चा होऊ शकत नाही, असे सभापती जगदीप धनखड यांनी स्पष्ट केले. त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. तर 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस असल्यामुळे संसदेचे कामकाज बंद होते.
त्यानंतर आज, बुधवारी (27 नोव्हेंबर रोजी) संसदेचे कामकाज सुरु होताच गदारोळ झाला. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब केले. तर गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाजही सकाळी 11.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतरही दोन्ही सभागृहांमध्ये विरोधांचा धिंगाणा सुरूच राहिला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अदानी, संभल, मणिपूर आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर घोषणा देत होते आणि प्रश्नोत्तराचा तासही सुरू होऊ दिला नाही. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी सभागृह तहकूब करावे लागल्यानंतर बिर्ला यांनी तातडीने लोकसभेतील गटनेत्यांची बैठक घेतली होती अधिवेशनामध्ये अनेक mallमुद्द्यांवर चर्चा करता येऊ शकते. पण, गदारोळामुळे कोणतीही सकारात्मक चर्चा होत नाही. त्यामुळे विरोधकांनी सभागृह चालवण्यासाठी सहकार्य करावे. सभागृहात घोषणाबाजी वा फलकबाजी करू नये, असे आवाहन बिर्ला यांनी केले होते .तसेच हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच्या प्रस्तावनेच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात म्हणाले होते की, आता संसदेत प्रत्येक मुद्यावर सखोल विश्लेषण झाले पाहिजे. जग भारताकडे आशेने पाहत आहे. जगात भारताचे आकर्षण वाढत आहे. त्याला बळ मिळावे, असे उदाहरण आपण ठेवले पाहिजे. संसदेतून तो संदेश गेला पाहिजे, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली होती.