अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलकातामध्ये जन्मलेले भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. जय भट्टाचार्य यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय जेमिसन ग्रीर यांची यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR) म्हणून निवड करण्यात आली आहे . तसेच केविन ए. हॅसेट यांची व्हाईट हाऊसच्या नॅशनल इकॉनॉमिक कौन्सिलच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही संस्था देशातील ४७.३ अब्ज डॉलर्सचे बजेट असलेली देशातील वैद्यकीय संशोधनात प्रमुख सार्वजनिक निधी देणारी संस्था आहे. एनआयएच ही आरोग्य आणि मानव सेवा विभाग (एचएचएस) अंतर्गत कार्यरत असून, वैद्यकीय संशोधन आणि नवोपक्रमासाठी जबाबदार असलेली प्राथमिक यूएस सरकारी संस्था आहे.यासह भट्टाचार्य हे सर्वोच्च प्रशासकीय पदासाठी नामांकन होणारे पहिले भारतीय-अमेरिकन बनले आहेत.
यापूर्वी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी टेस्लाचे मालक एलोन मस्क यांच्यासह नव्याने स्थापन झालेल्या सरकारी कार्यक्षमता विभागाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय-अमेरिकन विवेक रामास्वामी यांची निवड केली होती. “मला जय भट्टाचार्य, एमडी, पीएचडी, यांना एनआयएचचे संचालक म्हणून नामित करताना आनंद होत आहे,” असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हंटले आहे. भट्टाचार्य रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्याबरोबर काम करतील. तसेच ते “एनआयएचला वैद्यकीय संशोधनाच्या सुवर्ण मानकावर पोहोचविण्यासाठी ते देशातील दीर्घकालीन आजार आणि रोगाच्या संकटासह अमेरिकेतील सर्वांत मोठ्या आरोग्यविषयक आव्हानांवर उपाय शोधतील,” असे ते म्हणाले आहेत. .
जय भट्टाचार्य यांचा जन्म कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला आहे .उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी १९९० च्या दशकात त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्ट्स आणि नंतर मास्टर ऑफ आर्ट्स केले. यानंतर त्यांनी डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) पदवी प्राप्त केली आणि 2000 मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे.
ते सध्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात आरोग्य धोरणाचे प्राध्यापक आहेत. तसेच नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून काम करत आहे. ते स्टॅनफोर्ड येथील सेंटर फॉर डेमोग्राफी अँड इकॉनॉमिक्स ऑफ हेल्थ अँड एजिंगचे संचालक आहेत.भट्टाचार्य यांनी स्टॅनफोर्ड सेंटर फॉर डेमोग्राफी ॲण्ड इकॉनॉमिक्स ऑफ हेल्थ ॲण्ड एजिंग येथे संचालक म्हणून काम केले; जिथे त्यांनी आरोग्य धोरण आणि आर्थिक संशोधनात योगदान दिले. स्टॅनफोर्डच्या अधिकृत वेबसाइटनुसार, भट्टाचार्य यांचे संशोधन असुरक्षित गटांचे आरोग्य सुधारण्यावर केंद्रित आहे.
अलीकडे त्यांनी कोविड-१९ च्या महामारी विज्ञानाच्या अभ्यासात आणि साथीच्या आजाराशी संबंधित धोरणांच्या परिणामकारकतेचेही मूल्यांकन केले आहे. अर्थशास्त्र, कायदा आणि आरोग्य जर्नल्समध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.