मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पत्रकार परिषद पार पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी कोणतीही भूमिका मांडली नव्हती. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत का ? अश्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या. मात्र आज पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात भाजपच्या जेष्ठ नेतृत्वाने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असेल असे स्पष्ट केले आहे. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासह शिवसेनेचे नेते दादा भुसे, संजय शिरसाट आणि इतर नेते उपस्थित होते
पत्रकार परिषदेत त्यांनी सगळ्या पत्रकारांचे स्वागत केले. निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच तुम्ही भेटत आहात. तुमच्या माध्यमांतून सगळ्या मतदारांचे आभार मानतो. हा जो विजय आम्हाला मिळाला तो अभूतपूर्व विजय आहे. असे म्हणत याचे श्रेय त्यांनी सर्व मतदारांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहे.
मागच्या अडीच वर्षात महायुतीने उत्तम काम केले आहे. एकीकडे विकासकामे केली, महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तसेच दुसरीकडे कल्याणकारी योजना राबवल्या. तर एकीकडे विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे त्यामुळे मी सामान्यांच्या वेदना, काटकसर, तडजोडी सगळं पाहिले आहे. महायुतीवर लोकांनी विश्वास दाखवला. समाजातल्या सगळ्या घटकांसाठी आपण काही ना काही केले पाहिजे अशी भावना माझ्या मनात होती असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मी लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कुठलंही मोजमाप व्हावं म्हणून मी काम केलेले नाही. तर सरकार म्हणून काय देऊ शकतो ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. असे सांगत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मी मोदींना तसेच अमित शाह यांना फोन करुन सांगितले की सरकार बनवताना माझ्यामुळे अडचण येणार नाही. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम असेल याची खात्री बाळगा.असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.