पाकिस्तानमध्ये गेले काही दिवस पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि पाकिस्तान सरकार यांच्यात रक्तरंजित संघर्ष चालू आहे.हे समर्थक इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी हिंसक प्रदर्शन करत आहेत.
पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये पीटीआयचे ज्येष्ठ नेते आणि खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी सुंदर खोऱ्यातील मानसेरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत तत्कालीन शेहबाज सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “आमचे आंदोलन संपले या भ्रमात सरकारने राहू नये, असेही ते म्हणाले आहेत. “इस्लामाबादमध्ये सरकारने नि:शस्त्र पीटीआय कार्यकर्त्यांवर अत्याचार केले आहेत. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.पण तरीही पीटीआयचा देशव्यापी संप थांबणार नाही.तो चालूच राहील”.
अली अमीन गंडापूर म्हणाले की, पीटीआयने कायदा आणि लोकशाहीचे वर्चस्व राखत नेहमीच शांततापूर्ण आंदोलने केली आहेत.मात्र पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. 8 फेब्रुवारीच्या निवडणुकीत पीटीआयचा जनादेश चोरला गेला. याविरोधात बोलण्याची आता आम्हाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. तसेच अन्यायाविरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. मात्र पक्षाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पीटीआयचे नेते आणि मुख्यमंत्री गंडापूर यांनी स्पष्ट केले आहे.तसेच निशस्त्र आंदोलकांविरुद्ध हिंसाचाराचा वापर करणे टाळावे, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी राजधानीत फेडरल कॅबिनेटच्या बैठकीला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी पीटीआयचे नाव न घेता निशाणा साधला. देशाला आंदोलनाच्या राजकारणापासून मुक्त करण्याची आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज शाहबाज यांनी यावेळी व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत की , “आम्ही पाकिस्तानला वाचवायचे का या आंदोलनांना परवानगी द्यायची हे ठरवावे लागणार आहे”.