राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आज मानवी तस्करी प्रकरणी 6 राज्यांमध्ये 22 ठिकाणी छापेमारी केली आहे. सकाळी एनआयएच्या पथकाने राज्य पोलिसांसह ही कारवाई केली आहे. तस्करीचे संघटित नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी तपास यंत्रणेने ही मोहीम सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी विशिष्ट माहितीच्या आधारे संशयितांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.एका संघटित टोळीने भारतीय तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची विदेशात तस्करी केली आणि सायबर फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडले अशी काहीशी माहिती या प्रकरणातून पुढे आली आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असुरक्षित व्यक्तींच्या तस्करीत गुंतलेल्या संशयित व्यक्ती आणि संस्थांना लक्ष्य करून अनेक राज्यांमध्ये असे छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएने हे प्रकरण पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे, असे सांगितले जात आहे की या प्रकरणामध्ये राज्याच्या सीमा ओलांडून शक्यतो आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष, महिला आणि मुलांची तस्करी करण्याचे प्रकार समाविष्ट आहेत.
भारतात मानवी तस्करी ही मोठी समस्या आहे. येथे दरवर्षी हजारो लोक विशेषत: जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. ते तस्करीचे बळी ठरत आहेत. कठोर कायदे आणि आंतरराष्ट्रीय बांधिलकी असूनही, तस्कर टोळ्या स्थानिक पातळीवर सक्रिय आहेत. आणि त्यांच्या कमकुवतपणाचा आणि गरिबीचा फायदा घेतात.मात्र अलीकडच्या काही वर्षांत सुरक्षा यंत्रणांनी मानवी तस्करीचा मुकाबला करण्यासाठीचे प्रयत्न तीव्र केले आहेत. तस्करांच्या पुरवठा साखळीत व्यत्यय आणण्यावर आणि पीडितांची सुटका करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. एनआयएचे छापे हे अशा कारवाया मोडून काढण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.