संसद हिवाळी अधिवेशन 2024 : विरोधकांच्या गोंधळामुळे आज सलग तिसऱ्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज ठप्प करावे लागले आहे. अदानी लाचखोरी आणि संभल प्रकरणावरून दोन्ही सभागृहात गदारोळ झाल्याने कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी आज लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. दुपारी कामकाज पुन्हा सुरू झाले असतानाही असतानाही विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 वरील संयुक्त संसदीय समितीचा अर्थात जेपीसीचा कार्यकाळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी हा प्रस्ताव मांडला.
यादरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेचे कामकाज चालू न दिल्याबद्दल विरोधकांचा निषेध केला. ते म्हणाले की, अधिवेशन पूर्व बैठकीत सर्व सदस्यांनी विधेयकांवर चर्चा करून कामकाज सुरळीत चालवण्यास तयारी दर्शवली होती. मात्र, आता येथे गोंधळ सुरू आहे.
वक्फ संबंधित समितीचा कार्यकाळ वाढवताना विरोधकांनी केलेल्या गदारोळाचाही त्यांनी निषेध केला. ते म्हणाले की, समितीचा कार्यकाळ वाढविण्यावर सर्वानुमते एकमत झाले होते, मात्र या प्रस्तावावरील मतदानादरम्यान विरोधक गदारोळ करत आहेत.
तत्पूर्वी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनाची विरोधकांना आठवण करून देताना सांगितले की, संविधान सभेतही मतभेद आणि वादविवाद होते, परंतु अशा प्रकारचा गदारोळ योग्य नाही. ते म्हणाले की, संविधानाच्या 75 वर्षांच्या काळात संविधान सभेत वाद-विवाद, मतभेद आणि एकमत झाले परंतु सर्वांनी सन्मानपूर्वक आचरण ठेवले. ते प्रत्येक मुद्द्यावर विरोधकांना पुरेसा वेळ आणि संधी देतील.असे वारंवार सांगुनही विरोधकांनी आपला गोंधळ चालूच ठेवला.
दरम्यान, राज्यसभेचे कामकाजही विस्कळीत झाले. सकाळच्या कामकाजाच्या सुरुवातीला, विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, तिरुवनंतपुरम येथे निवडणुकीसाठी प्रस्ताव मांडला, ज्याला राज्यसभेने मंजुरी दिली.
राज्यसभेचे कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष जगदीप धनखर म्हणाले की, आमच्या राष्ट्रीय भावना सभागृहात दिसल्या पाहिजेत. संसदेतील व्यत्यय आणणे हा उपाय नसून तो एक रोग आहे. यामुळे आपला पाया कमकुवत होतो आणि संसद अप्रासंगिक बनते. त्यामुळे आपण त्याची प्रासंगिकता सुनिश्चित करणे सुरू ठेवले पाहिजे.
ते म्हणाले की, जेव्हा आपण अश्या प्रकारे विधायक चर्चांपासून भरकटतो तेव्हा लाखो लोकांच्या विश्वासाचा आदर करण्यात आपण अपयशी ठरतो जे आपल्याकडे त्यांच्या लोकशाही आकांक्षांचे संरक्षक म्हणून बघत असतात.