राज्यात महायुतीने विधनसभेत भूतो न भविष्यती अशी कामगिरी करून दाखवली. या लाटेत महाविकास आघाडी भुईसपाट झाली. त्यांना इतका मोठा झटका बसेल असे वाटले नव्हते. मात्र माविआचा 50 जागांच्या आत खेळ आटोपला. तर महायुतीने 230 हून अधिकचा मॅजिक फिगर गाठला. त्यात भाजपाला 132 जागांवर यश आले. अर्थात भाजपा मोठा भाऊ ठरला. त्यानंतर शिंदे सेनेला 57, अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. मात्र अजूनही महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर येत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. आता हाच तिढा सोडवण्यासाठी महायुतीचे तिन्ही जेष्ठ नेते, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱयावर जात आहेत.
आज महायुतीमधील दिग्गज नेते हे दिल्ली दरबारी उपस्थित असतील.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची संध्याकाळी पाच वाजता बैठक होत आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असतील याबाबतची घोषणा होणे अपेक्षित आहे. यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या खलबते झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे रेटण्यात येत होते. या दोघांनी याविषयीचा निर्णय दिल्लीतून होईल हे आधीच स्पष्ट केले आहे. तर अनेकजण मोदी आणि शाह हे राज्यात धक्कातंत्र वापरण्याची शक्यता वर्तवत आहेत. राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होईल की महायुतीचा मुख्यमंत्री असेल याविषयी आता चर्चा रंगली आहे. अजितदादांनी मुख्यमंत्री पदावर कोणताही दावा न करता थेट भाजपाला, पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला होता. तसेच माध्यमांसमोर येत एकनाथ शिंदे यांनी सस्पेन्सवर पडदा टाकत अजित पवार यांच्यानंतर त्यांनी सुद्धा भाजपा जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे जाहीर केले. तेव्हा भाजपचे हायकमांड काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.