एकीकडे उत्तर प्रदेशातील संभलमध्ये मुघलकालीन मशिदीच्या सर्वेक्षणाला विरोध झाल्यामुळे हिंसाचार उफाळला होता. तर दुसरीकडे राजस्थानच्या अजमेर शरीफवरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हा दर्गा एका शिवमंदिराच्या जागेवर उभारण्यात आला आहे,असा दावा करीत हिंदू सेनेने न्यायालयात धाव घेतली आहे.न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास मंजुरी दिल्यानंतर संबंधित पक्षांना नोटीस जारी करीत उत्तर देण्यास सांगितले आहे.मात्र याबाबत आता कॉंग्रेससह,समाजवादी पक्षाचे नेते खासदार राम गोपाल यादव , असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध दर्शवला आहे.
भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अजमेर शरीफ दर्ग्याच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्यांवर टीका केली आणि ते संभल हिंसाचार पुन्हा घडवू इच्छितात असा गंभीर आरोप केला आहे.
गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सिंह यांनी यांनी काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर टीका करत सध्याच्या हिंसाचार होत असलेल्या परिस्थितीचे तेच कारण असल्याचे म्हंटले आहे.
“अजमेरमध्ये, न्यायालयाने सर्वेक्षणाचे निर्देश दिले. जर कोणत्याही हिंदूने याचिका दाखल केली असेल आणि न्यायालयाने सर्वेक्षणाचे आदेश दिले असतील, तर काय अडचण आहे? मुघलांनी आमची मंदिरे उद्ध्वस्त केली.नेहरूंनी मंदिरे पाडून मशिदी बांधण्याची ही मोहीम थांबवली असती तर ही वेळच आली नसती तसेच न्यायालयात याचिका दाखल झाली नसती,असे सिंह म्हणाले आहेत.
तर समाजवादी पक्षाचे (एसपी) राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांनी भाजपवर टीका करत आरोप केला होता की,जगभरातून लोक अजमेर शरीफ दर्गाला भेट देण्यासाठी येतात आणि त्या जागेवर वाद निर्माण करणे हे केवळ भाजपच करू शकते.
तत्पूर्वी, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कनिष्ठ न्यायालयांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच मुद्दाम आमच्या धार्मिक स्थळावर गदा आणली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अजमेर शरीफ दर्गा हे भगवान शिवाचे मंदिर असल्याचा दावा करणारी हिंदू सेनेची याचिका राजस्थानच्या न्यायालयाने स्वीकारल्यानंतर आता ह्या प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.मात्र या दाव्यानंतर आता मुस्लिम समुदायाकडून टिप्पणी आली आहे. ऑल इंडिया सूफी सज्जादानशीन काउंसिलचे अध्यक्ष आणि ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीचे वंशज सैयद नसीरुद्दीन चिश्ती यांनी सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. देशात आता रोज मशिदीच्या ठिकाणी मंदिर असल्याचे दावे दाखल होत असल्याचे म्हंटले असून आम्ही कायदेशीर पावले उचलणार असल्याचे चिश्ती यांनी म्हटले आहे.