बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी इस्कॉन गुरु चिन्मय दास यांच्या अटकेचा निषेध केला आहे. तसेच बांगलादेशच्या अंतरिम सरकारला त्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे. बांगलादेशमध्ये नुकतेच हिंदू समूह समिष्ठ सनातनी जोतचे नेते आणि इस्कॉन ट्रस्टचे सचिव चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना अटक करण्यात आली असून याचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात येत आहे.
बांगलादेशातील अनेक भागात लोकांनी चिन्मय दास यांच्या अटकेच्या विरोधात रस्त्यावर उतरून सुटकेची मागणी केली. भारतातही अनेकांनी चिन्मय दासच्या अटकेला विरोध दर्शवला असून केंद्र सरकारने हे प्रकरण बांगलादेश सरकारकडे मांडण्याची मागणी केली आहे. याशिवाय, सुरक्षा दल आणि चिन्मय कृष्ण दास यांच्या अनुयायांमध्ये झालेल्या हिंसक चकमकी दरम्यान त्यांच्या वकिलाच्या हत्येचा देखील शेख हसीना यांनी निषेध केला आहे. या प्रकरणी शेख हसीना यांनी न्यायाची मागणी करत करताना या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त करत वकिलाच्या खुनात सहभागी असलेल्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना शिक्षा देण्याची मागणी केली.
त्याचप्रमाणे शेख हसीना यांनी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार मानवी हक्कांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. या घटनेतून मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन झाले आहे. आपले कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या वकिलाला एखाद्या अतिरेक्याप्रमाणे ठार करणे अयोग्य आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा शेख हसीना यांनी सरकारला दिला आहे .