महाराष्ट्रातील निवडणूक निकालाला पाच दिवस उलटले तरी मुख्यमंत्र्यांबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) काल राजधानी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे 3 तास चालली. त्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली.
सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार अमित शाह यांनी एकनाथ शिंदे,अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. शहा यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांशी मंत्रीपदाबाबत विचारमंथनही केले. भाजप जवळपास 20 मंत्रीपदे स्वतःजवळ ठेवेल अशी माहिती समोर येत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त मंत्रिपद मिळतील असे सांगितले जात आहे.
शहा यांच्या भेटीनंतरही मुख्यमंत्र्यांबाबत सस्पेन्स कायम आहे. रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही मुंबईत परतले. आज फोनवरच चर्चेची दुसरी फेरी होऊ शकते अशी बातमी आहे. त्याचबरोबर 2 डिसेंबर किंवा 5 डिसेंबरला शपथविधी होऊ शकतो, अशीही माहिती समोर येत आहे.
तर एका बाजूला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणविसांचे नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यासाठीच्या सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.
शाह यांच्याशी झालेल्या भेटीबाबत एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ही भेट अतिशय चांगली आणि सकारात्मक झाली. मुंबईत दुसरी बैठक होणार असून त्यात मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे .
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली होती. त्यानंतर स्पष्ट बहुमतासह महायुतीचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून 132 जागा जिंकून इतिहास रचला. शिदेंच्या शिवसेनेने 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. उद्धव गटाला 20, काँग्रेसला 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 10 जागा मिळाल्या आहेत .