नोव्हेंबर अखेरच्या आठवड्यात थंडीचा ज्वर चढायला लागला असून आता शहरातील बहुतांश भागासह गावागावात सर्वत्रच शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. सर्वत्रच किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून राज्यातील अनेक भागात हुडहुडी भरली आहे. अनेक शहरांमध्ये पारा घसरला असून थंडीत मोठी वाढ झाली आहे. तर काही शहरांमध्ये किमान तापमानात घट होऊन ते एका अंकावरती आले आहे. मुंबई, पुण्यातही थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे, याआधी काही दिवसांपूर्वीच तापमान 16.8 अंशावर घसरलं होते .हवामान खात्याने येत्या तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.
उत्तरेकडून हिमालयाच्या दिशेने येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढला आहे.त्यामुळे कोरड्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसून येत आहे. परिणामी राज्यात येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. विशेषकरुन मेळघाट म्हणजे धारणी – चिखलदरा तालुक्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होणार असून याठिकाणी थंडीचा जोर वाढणार आहे. दरम्यान, जिल्ह्यांमधील बहुतांश तालुक्यातील कमाल आणि किमान तापमानात वेगाने घसरण होत आहे..
प्रामुख्याने चिखलदरा आणि धारणीच्या घाटमाथ्यावर धुक्याची चादर दिसू लागली आहे. नोव्हेंबरच्या अखेरचा आठवडा चांगलाच गारठवणारा ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातच नाही तर शहरात देखील रात्रीच्या वेळी रस्त्यांवर ठिकठिकाणी आणि विशेषकरुन बांधकामाच्या ठिकाणी मजूर, कष्टकरी थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. आतापर्यंत रात्री ते पहाटेपर्यंत जाणवणारी थंडी आता दिवसादेखील जोर धरत आहे. त्यामुळे दिवसाही आता गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होणार आहे. यामुळे या ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ८० किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. २७ नोव्हेंबर रोजी निर्माण होणारे हे चक्रीवादळ येत्या दोन दिवसांत श्रीलंकेचा किनारा ओलांडून तामिळनाडूच्या दिशेने जाणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवली आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होणार असून राज्यात थंडीचा कडाका अजून पाच दिवस चांगलाच जाणवणार आहे.