फेंगल चक्रीवादळ आज संध्याकाळी तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे होत असलेल्या सततच्या पावसानंतर भारतीय हवामान खात्याने दक्षिणेकडील राज्यांच्या विविध भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार , चक्रीवादळ 7 किमी/तास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकत आहे आणि सध्या ते नैऋत्य बंगालच्या उपसागरात स्थित आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले फेंगल चक्रीवादळ आज दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान तामिळनाडूच्या पुडुचेरी आणि महाबलीपुरम जिल्ह्यातील कराईकलच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या बहुतांश भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. किनारी भागात खळबळ उडाली आहे. भारतीय हवामान खात्यानुसार,फेंगलच्या प्रभावामुळे वाऱ्याचा वेग ताशी 90 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो.
या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडूला बसला आहे. अतिवृष्टीमुळे बहुतांश भागात भाताचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. एकट्या नागापट्टिनम जिल्ह्यात 800 एकरपेक्षा जास्त पिके पाण्याखाली गेली आहेत. कामेश्वरम, विरुंधमावाडी, पुडुपल्ली, वेद्रप्पू, वनमादेवी, वल्लापल्लम, कल्लीमेडू, एरावयल आणि चेंबोडी जिल्ह्यांनाही याचा फटका बसला आहे. चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरु आहे. ३ डिसेंबरपर्यंत राज्याच्या अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूमधील आज सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत.
परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, IMD ने तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, केरळ आणि अंतर्गत कर्नाटकातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे , तर तामिळनाडूच्या अंतर्गत भागातही ३० नोव्हेंबरला मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. किनारपट्टीच्या भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच प्रशासनही सतर्क आहे.