विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटला तरीही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. त्यावरून विरोधकांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. इतके स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही. आता सांगण्यात येत आहे की ५ डिसेंबरला शपथविधी होऊ शकतो ,याचा अर्थ लोकांच्या बहुमताला काहीच महत्त्व नाही. जे काही चाललंय ते राज्यासाठी अशोभनीय आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी महायुतीवर टीका केली आहे. त्याचसोबत त्यांनी ईव्हीएमवरूनही शंका उपस्थित केली आहे.
पुणे येथे बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी शरद पवारांनी भेट दिली होती. गेल्या ३ दिवसांपासून ईव्हीएमविरोधात बाबा आढाव आंदोलनाला बसले आहेत. आढाव यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणुकीच्या निकालानंतर जी अस्वस्थता आहे त्यातून बाबा आढाव हे आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. ज्या निवडणुका झाल्या त्यात सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर यापूर्वी कधीही बघिततला नव्हत्या अशा चर्चा लोकांमध्ये आहे. राज्याच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण निवडणूक यंत्रणा हाताशी घेतली गेली ते चित्र महाराष्ट्रात बघायला मिळाले त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढली.
संसदेबाहेर जे भेटले त्या सगळ्यांना जयप्रकाश नारायण यांची आठवण झाली. आज धोरणात्मक पाऊल टाकण्याची गरज आहे. बाबा आढाव यांनी पुढाकार घेतला, आज ते महात्मा फुले यांच्याशी संबंधित वास्तूमध्ये आत्मक्लेश आंदोलनाला बसले आहेत. बाबांच्या या आंदोलनाने सामान्यांना एकप्रकारे दिलासा मिळतो आहे. बाबा आढाव यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणे हे सोयीचे नाही, शेवटी जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नांची लढाई लढेल असे शरद पवार म्हणाले आहेत.