गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आता येत्या 5 डिसेंबरला महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा सोहळा पार पडणार असून सध्या याची जय्यत तयारी सुरु आहे.या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवीन मुख्यमंत्री असणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले आहे. आज म्हणजेच सोमवार 2 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. त्यानंतर आज भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी आज २ किंवा उद्या ३ डिसेंबर रोजी बैठक होईल. या बैठकीत विधीमंडळ गटनेत्याच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, अशीही माहिती समोर आली आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे 5 डिसेंबर रोजी शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहेत.
दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने गृहमंत्री पदाची मागणी केली होती. मात्र भाजपाने गृहमंत्री पद सोडण्यास नकार दिला आहे. तसेच राज्याचे गृहमंत्रिपद हे 2014 ते 2019 प्रमाणेच मुख्यमंत्र्यांकडे राहणार की गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींकडे सोपवल्या जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे अजित पवारांकडे अर्थ खाते असल्याने त्यावर शिंदेंच्या पक्षाला दावा सांगता आलेला नाही. त्यामुळेच आता शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाकडून जास्तीत जास्त महत्त्वाची खाती आपल्याकडे खेचून घेण्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान गृहमंत्रीपदासह अन्य विषयांवर महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते आम्ही एकत्र बसून चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहेत. महायुती मधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये पदासाठी कोणतीही चढाओढ नसून तिघात अतिशय उत्तम समन्वय आहे आणि समन्वयाच्या भूमिकेतूनच सारे निर्णय घेतले जातील असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.
आजच्या चर्चेमध्ये गृहमंत्रीपद आणि इतर खात्यांवरुन कोणताही तोडगा निघाला नाही तर पुन्हा दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची चर्चेची एक फेरी होऊ शकते. परंतु, एकनाथ शिंदे यांचा सध्याचा ठाम पवित्रा बघता ते गृहमंत्रीपदाच्या मागणीवरुन माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, असेही संकेत मिळत आहेत. तसेच या गोंधळादरम्यान विधानसभेची मुदत 26 तारखेलाच संपली असून सध्या राज्याच्या कारभार काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाळत आहेत.