बारा वर्षांतून एकदा प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विविध स्तरावर जोरदार तयारी चालू आहे. प्रयागराजमधील ज्या भागात महाकुंभमेळा भरवला जातो, त्या संपूर्ण भागाचा एक जिल्हा घोषित करण्यात आला आहे. त्या जिल्ह्याला ‘महा कुंभ मेळा’ असं नामकरण करण्यात आलं आहे. या जिल्ह्याचं व्यवस्थापन पूर्ण स्वतंत्रपणे होणार आहे. महा कुंभ मेळ्याचं आयोजन आणि त्या संदर्भातल्या सर्व बाबींची पूर्तता व्यवस्थितपणे व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे योगी आदित्यनाथ सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुढील वर्षी १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभ मेळ्यामध्ये लाखोंच्या संख्येनं देश-विदेशातून भाविक, साधू, तपस्वी येतात. प्रशासनाला या काळात व्यवस्थापनासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला जातो. आत्तापर्यंत प्रयागराज जिल्हा प्रशासनाकडून महाकुंभमेळ्याचं व्यवस्थापन पाहिलं जात होतं. पण आता महाकुंभमेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे. महाकुंभमेळ्याच्या परिसरामध्ये व्यवस्था आणि इतर बाबींच्या तरतुदीसाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या बाबींवर काम केले जात आहे.
महाकुंभ मेळा या नावाने नवा जिल्हा तयार केल्यानंतर उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांची संख्या आता ७५ वरून ७६ इतकी झाली आहे. महाकुंभ सोहळ्यानंतरही अतिरिक्त जिल्हा कायम राहणार आहे. कुंभ आणि अर्ध कुंभ सोहळ्यावेळी जिल्ह्याची अधिसूचना जारी करण्याची परंपरा आहे. अधिसूचनेनुसार सदर तालुक्यातील २५ गावे, सोराव तालुक्यातील तीन गाव, फूलपूरमधील २० गावे, तर करछनामधील १९ गावांचा यात समावेश आहे.
प्रयागराजचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार मांदड यांनी रविवारी रात्री उशिरा याबाबत अधिसूचना जारी केली. महाकुंभ मेळा जिल्ह्यात पूर्ण परेड क्षेत्र आणि चार तालुक्यांसह ६७ गावे आहेत. महाकुंभ मेळा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय किरण हे असतील. तर एसएसपी म्हणून राजेश द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २३ नोव्हेंबर २०२४ रोजीची ही अधिसूचना असून त्यात स्वतंत्र जिल्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये महा कुंभ मेळा जिल्ह्याच्या सीमाही निश्चित करण्यात आल्या असून त्याचं व्यवस्थापन कसं असेल, तेही नमूद करण्यात आलं आहे. त्यानुसार महाकुंभमेळा व्यवस्थापन समितीतील प्रमुख कार्यकारी न्यायदंडाधिकारी, जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतील.
दरम्यान, दोन महिन्यांवर आलेल्या महा कुंभ मेळ्याच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. यावेळी महा कुंभ मेळ्याचे व्यवस्थापन आणि सुरक्षा तरतुदींसदर्भात बैठकांचे आयोजन करण्यात आलं आहे.