Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi ) आज पुण्यातील न्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यासाठी राहुल गांधींना आज पुणे न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
याआधीही नोव्हेंबरमध्ये राहुल गांधींना या प्रकरणी कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते कोर्टात हजर झाले नाहीत. समन्स न मिळाल्याचे कारण त्यांनी यामागे दिले होते.
काय आहे प्रकरण?
सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात पुण्यातील न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटले आहे की, ‘राहुल गांधी यांनी मार्च महिन्यात लंडनमध्ये केलेल्या भाषणात सावरकरांनी एका पुस्तकात मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.’
‘सावरकरांनी पुस्तकात लिहिले आहे की, त्यांच्या 5-6 मित्रांनी एकदा एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती, ज्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता.’ राहुल गांधींनी केलेल्या याच वक्तव्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तसेच सावरकरांनी कोणत्याही पुस्तकात असे म्हटलेले नाही, असेही स्पष्टपणे सात्यकी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाची 4 ऑक्टोबर रोजी संयुक्त दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार/आमदार विशेष न्यायालयात सुनावणी झाली, त्यानंतर राहुल गांधींना हजर राहण्यास सांगण्यात आले. यासाठी 23 ऑक्टोबर रोजी समन्स बजावण्यात आले होते.
मात्र, राहुल गांधी न्यायालयात हजर राहिले नाहीत. या संदर्भात आपल्याला कोणतेही समन्स मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर, त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आणि 2 डिसेंबर रोजी पुण्यातील खासदार/आमदार विशेष न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी आजही न्यायालयात हजर राहणार नाहीत. कारण सध्या हिवाळी आदिवेशन सुरु असून, राहुल गांधींच्या जागी त्यांचे वकील न्यायालयात उपस्थित असणार आहेत.