Israel : हिजबुल्लाह सोबत युद्धविराम लागल्यानंतर इस्रायलने कट्टरतावाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन गवीर यांनी देशातील पोलिसांना मशिदींमधील मुस्लिमांच्या अजानवर तातडीने बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. याद्वारे मुस्लिम ज्यू लोकांना विनाकारण त्रास देतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
बेन गवीर म्हणतात की, अनावश्यक आवाज आणि गोंधळाला तोंड देण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच इस्राईलच्या मंत्र्याने पोलिसांना मशिदींवर दंड आकारण्याचे आणि तेथे लावलेले सर्व लाऊडस्पीकर जप्त करण्याचे निर्देशही दिले आहेत. मशिदी किंवा इतर स्त्रोतांमध्ये होणारा अयोग्य आवाज इस्त्राईली लोकांसाठी मोठा धोका बनत असल्याने या धोरणाची गरज असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
आपल्या या निर्णयावर इस्रायली मंत्री म्हणाले की, ‘काही अरब देशांव्यतिरिक्त पाश्चिमात्य देशही या विषयावर कायदे करत आहेत, जेणेकरून आवाज कमी करता येईल. आत्तापर्यंत इस्राईलमध्ये याकडे दुर्लक्ष केले जात होते, परंतु आतापासून असे होणार नाही.’ असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, मध्यपूर्वेतील मुस्लिम देश इस्राईलने घातलेल्या या बंदीविरोधात आवाज उठवत आहेत. संयुक्त अरब सूचीचे नेते मन्सूर अब्बास यांनी बेन गवीर यांचा निषेध केला आणि आरोप केला की जेव्हा इस्राईली मंत्री अल अक्सा मशिदीच्या आत हिंसाचार भडकावू शकत नाहीत, म्हणून आता मशिदींना लक्ष्य करत आहेत. असे त्यांनी म्हंटले आहे.
तर कौन्सिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स (CAIR) ने इस्राईलच्या या कृतीचा निषेध केला आहे. मशिदी, चर्च, धार्मिक ग्रंथ किंवा सांस्कृतिक स्थळांवर होणारे हल्ले हे अनेक दशकांपासून पॅलेस्टिनी संस्कृती नष्ट करण्याच्या इस्राईलच्या कटाचा भाग असल्याचा आरोप संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी संचालक निहाल आवाड यांनी केला आहे.