श्रीनगरच्या दाचीगाम जंगलात मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या परिसरात अजूनही कारवाई सुरू आहे.
पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे, सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकांनी दाचीगाम जंगलाच्या वरच्या भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. संशयास्पद ठिकाणी पोहोचल्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू झाला.त्यादरम्यान दहशतवादी मारला गेला.
याआधी 23 नोव्हेंबर रोजी बारामुल्ला पोलिसांनी सुरक्षा दलांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत शनिवारी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील कुंजेर भागात दहशतवाद्यांच्या एका अड्ड्याचा पर्दाफाश केला होता.
बारामुल्ला पोलीस, बडगाम पोलीस आणि 62 आरआर यांनी पोलीस स्टेशन कुंझरच्या अखत्यारित असलेल्या माळवा गावाला लागून असलेल्या जंगलात संयुक्त कारवाई सुरू केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या शोध मोहिमेदरम्यान, पोलिसांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आणि लपण्याचे ठिकाण देखील नष्ट केले,त्यामुळे संभाव्य अनुचित घटना उधळली गेली. आणि काश्मीर खोऱ्यातील शांतता आणि सौहार्द भंग करण्याच्या दहशतवादी संघटनांच्या नापाक योजना हाणून पाडल्या होत्या.