विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची काँग्रेसच्या केंद्रीय श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी याबाबतचा आपला सविस्तर अहवाल श्रेष्ठींना दिला आहे. त्यावर राज्यात संघटनात्मक पातळीवर फार मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. तरुणांना वाव देण्याबरोबरच नवे, राजकीय पार्श्वभूमी नसलेले चेहरे देण्याबाबत खुद्द राहुल गांधी यांनीच सूचना केली असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे . याबाबत येत्या आठ दिवसांतच बैठक होऊन निर्णय घेतले जातील अशी माहिती समोर आली आहे.
पक्षाला राज्यात लोकसभेला अनपेक्षित यश मिळाले होते.त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचा भाव वधारला. मात्र, त्याचा फायदा उचलण्याचे सोडून राज्यातील नेते आम्हीच मोठे भाऊ, आमचाच मुख्यमंत्री होणार, अशी जाहीर वक्तव्ये करू लागले. त्यावरही चेन्नीथला यांनी आपल्या अहवालात संबंधित नेत्यांवर अपरिपक्व असा शिक्का मारला असल्याचेही समोर आले होते. विधानसभेतील पराभवानंतर चेन्नीथला राज्यात एकदाही आले नाहीत. त्यांनी पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेण्याबाबत प्रदेश शाखेला कळवले. तशी बैठक झालीही, तर त्या बैठकीतच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेकांनी शरसंधान साधले व या पराभवाला तेच जबाबदार असल्याची टीका केली.
त्यावरून प्रदेश शाखेने विदर्भातील एका पराभूत आमदाराला नोटीस बजावली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना महाराष्ट्रात विजयाची अपेक्षा होती. विधानसभेमध्ये ती दूरच राहिली; उलट दारुण पराभव झाला. अनेक जेष्ठ नेत्यांना हार पत्करावी लागली. त्यामुळे खर्गे पक्षाच्या प्रदेश संघटनेवर संतप्त झाले. त्यांनी चेन्नीथला यांना याबाबत विचारणा केली. त्यामुळेच चेन्नीथला यांनी या पराभवाच्या कारणांचा सविस्तर अहवाल त्यांच्याकडे दिला आहे. दरम्यान एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळे निवडणुकीत पक्षाचे नुकसान झाले असे म्हणत खर्गे यांनी अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांचे कान उपटले आहेत. तसेच आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.