संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी आज, मंगळवारीही विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. परंतु, अदानीच्या मुद्यावरून काँग्रेस, समाजवादी पार्टी (सपा) आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यात मतभेद असल्याचे दिसून आले. विरोधकांनी लोकसभेतून वॉकआऊट केल्यानंतर सपा आणि तृणमूलचे सदस्य काँग्रेसच्या निदर्शनात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे इंडि आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे .
गेल्या 25 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सातत्याने गोंधळ सुरू आहे. काँग्रेस पक्षाचे संपूर्ण लक्ष अदानी प्रकरणावर आहे, मात्र समाजवादी पक्ष मात्र संभल हिंसाचारावर चर्चेची मागणी करत आहे. यापूर्वी सोमवारी, संसदेच्या कामकाजापूर्वी, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती, ज्यामध्ये राहुल गांधी उपस्थित होते, परंतु टीएमसीचा एकही खासदार उपस्थित नव्हता. तृणमूल काँग्रेसला महागाई, बेरोजगारी, शेतकरी, खते, विरोधी राज्यांना दिल्या जाणाऱ्या पैशात कपात आणि मणिपूर यांसारख्या मुद्द्यांवर सभागृहात चर्चा व्हावी, अशी इच्छा आहे. तर काँग्रेसला फक्त अदानी मुद्द्यावरच चर्चा व्हायची आहे. तसेच सपाही काँग्रेसच्या भूमिकेपासून दूर जाताना दिसत आहे. त्याचबरोबर शेतकरी, संभळ आणि मणिपूर या मुद्द्यांवरही चर्चा व्हावी, अशी इतर विरोधी पक्षांची इच्छा आहे. म्हणजेच सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा व्हायला हवी, अशी विरोधी पक्षांमध्ये टीएमसीची भूमिका स्पष्ट आहे, कमी-अधिक प्रमाणात समाजवादी पक्षालाही असेच काहीतरी हवे आहे.
अदानीच्या मुद्द्यावरून लोकसभेतून वॉकआऊट केल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रांच्या नेतृत्त्वात संसदेच्या आवारात निदर्शने केली आहेत. . परंतु, समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी या निदर्शनापासून फारकत घेतली आहे . काँग्रेसच्या निदर्शनामध्ये तृणमूलचे सदस्य सहभागी न झाल्याबद्दल शशी थरूर म्हणाले की, आतापर्यंत इतर बाबींमध्ये आमच्यामध्ये योग्य समन्वय सुरू आहे. बंगालमध्ये आपण एकत्र नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे कदाचित या विषयावरही तृणमूलची वेगळी भूमिका असेल असे थरूर म्हणाले.
सपा खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि संभल मुद्द्यावर चर्चेची विनंती केली. सपा नेत्यांच्या म्हणण्यानुसार, अदानीचा मुद्दा संभलइतका मोठा नाही. सपा खासदार धर्मेंद्र यादव म्हणाले आहेत की, आमच्यासाठी शेतकरी हा अदानीपेक्षा मोठा मुद्दा आहे. याचा अर्थ असा की काँग्रेस अदानीबद्दल बोलण्यात व्यस्त असली तरी अनेक विरोधी पक्षांना इतर मुद्द्यांवरही चर्चा करायची आहे. सपा खासदार इकरा हसन म्हणाल्या की, ‘अदानी मुद्द्यावर चर्चा महत्त्वाची आहे. मात्र, पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे संभल हिंसाचार हा समाजवादी पक्षासाठी अग्रक्रमाचा मुद्दा बनल्याचे त्यांनी सांगितले आहे .