पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांच्यावर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर परिसरात आज हा गोळीबाराचा थरार घडला असून या हल्ल्यातून बादल हे थोडक्यात बचावले आहेत. तेथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोराकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. नारायण सिंह चौरा असे आरोपी हल्लेखोराचे नाव असून तो खलिस्तान समर्थक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सुखबीरसिंग बादल यांना ऑगस्टमध्ये अकाल तख्तने ‘तनखैया’ (धार्मिक गैरवर्तनासाठी दोषी) घोषित केले होते, ज्यामध्ये त्यांना धार्मिक शिक्षा देण्यात आली होती. 2007 ते 2017 पर्यंत पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेले बादल हे सध्या सुवर्ण मंदिरात ‘सेवेदार’ म्हणून काम करत असून भांडी धुणे, शूज आणि स्नानगृहे साफ करणे – करत आहेत. अकाल तख्तने 2007 ते 2017 या कालावधीत पंजाबमधील एसएडी आणि त्यांच्या सरकारने घेतलेल्या “चुका” आणि “काही निर्णय” यांचे कारण देत त्यांना शिक्षा दिली होती.
आज हल्ल्याच्या वेळी बादल यांनी निळ्या रंगाचा सेवादारचा पोषाख परिधान केला होता. हातात भाला घेऊन व्हीलचेअरवर बसून ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर तैनात होते. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने ते व्हीलचेयरवर बसून पहारा देत असताना ही घटना घडली आहे.