राज्याला सर्वाधिक उत्सुकता लागून राहिलेल्या राज्याचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आज जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आज हा निर्णय होणार आहे.या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस ,पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे अनेक जेष्ठ नेते विधानभवनात दाखल झाले आहेत.
आज 10 वाजता भाजप विधीमंडळ पक्ष कार्यालयात चौथ्या मजल्यावर कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तर 11 वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीसाठी बैठक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. विधिमंडळ गटनेता निवडीनंतर भाजप प्रदेश पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजपचे निरीक्षक महायुतीच्या नेत्यांना भेटतील. सुमारे 3. 30 च्या सुमारास महायुतीचे नेते पक्ष निरीक्षक साडेतीन वाजता राज्यपालाकडे जाउन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.
विधीमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. हे दोन्ही निरीक्षक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील भेट घेतील. महायुतीत एकी आहे हा संदेश पोहोचवण्यासाठी ही भेट असेल असे बोलले जात आहे.
विधिमंडळ बैठकीबाबत विजय रुपाणी यांनी प्रतिक्रिया देत असे सांगितले आहे की “आमची भाजपाची एक ठरलेली कार्यपद्धती आहे. आम्ही लोकशाही परंपरेने काम करणारे लोक आहोत. लोकशाही पद्धतीनेच आम्ही आमचा नेता निवडू तसेच मुख्यमंत्रीपदासाठी अद्याप कोणाचेही नाव निश्चित झालेलं नाही. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नाव निश्चित केलं जाईल”.