विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर झालेल्या वेगवान घडामोडींनंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी चालली असून मुख्यमंत्री कोण…? यावर आज भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय होणार आहे.
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या 5 डिसेंबर 2024ला संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे.हा महायुतीचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला 70 हून अधिक व्हीव्हीआयपी नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी जवळपास 40 हजार मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण राज्यातील प्रमुख नेत्यांना दिले जाणार असून शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर, जयंत पाटील यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे
विशेष बाब म्हणजे, या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील चारशेहून अधिक साधू-संतांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय, विविध समाजाच्या प्रतिनिधींनाही निमंत्रणे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलेल्या संतांमध्ये जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज, गोविंददेव गिरी महाराज, बागेश्वर बाबा, महामंडलेश स्वामी विश्वेश्वरानंद महाराज, जैन संत लोकेश मुनी, बंजारा संत, शीख संत, बौद्ध भिक्खू यांचा समावेश आहे. याशिवाय काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी आणि महाकाल मंदिराचे मुख्य पुजारी, यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांच्या मुख्य पुजाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
यासोबतच लाडक्या बहिणींना शपथविधीसाठी विशेष आमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली असून 13 विशेष ब्लॉकमध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शपथविधीसाठी तीन स्टेजची उभारणी केली जाणार असून एक मुख्य स्टेज आणि आजूबाजूला दोन छोट्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे.