तेलंगणातील मुलुगू जिल्ह्याला आज, सकाळी तीव्रतेच्या भूकंपाचा धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.3 नोंदवण्यात आल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) दिली आहे . विशेष म्हणजे तेलंगणासोबतच महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर येथे देखील हे धक्के जाणवले आहेत. .
यासंदर्भात एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार आज, बुधवारी सकाळ 7 वाजून 27 मिनीटांनी तेलंगणाच्या मुलुगू जिल्ह्याला 5.3 तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपाचे केंद्र मुलुगू भागात भूगर्भात 40 किलोमीटर खोलीवर होते. या भूकंपाचे धक्के नागपूर आणि विदर्भाच्या पूर्व भागातही जाणवले. पूर्व विदर्भातील गडचिरोली शहरासह अन्य तालुक्यात आणि शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत झाले. गडचिरोली शहरात आज सकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. घरातील टीव्ही, फ्रीज व अन्य वस्तू हलल्या, खिडक्यांची तावदाणेही वाजली. गडचिरोलीसह अहेरी तालुक्यातील अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली, सिरोचा तालुका, कोरची, आरमोरी आदी तालुक्यांतही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर जमा झाले. शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यात आणि छत्तीसगड राज्याच्या काही भागातही भूकंपाचे धक्के बसले आहेत. गडचिरोली आणि चंद्रपूरसोबतच नागपूरला देखील भूकंपाचे धक्के बसले असून तिथल्या बेसा, हुडकेशवर, मनीष नगर, हनुमान नगर, काटोल रोड, गोधनी, पायोनियर कॉलनी अशा विविध भागातून सकाळी 7.30 वाजेच्या सुमाराला काही क्षणांसाठी धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या भूकंपामुळे राज्यात कुठल्याही जीवित किंवा वित्ती हानीचे वृत्त नाही. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारतीबाहेर मोकळ्या जागेत सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्ह्याला मागील 3 वर्षांत दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी 31 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी सिरोंचा, अहेरी, चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल एवढी होती. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2022 रोजी मध्यरात्री सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. ही तीव्रता 3.8 रिश्टर स्केल होती. आज झालेल्या भूकंपाची तीव्रता ही दोन्ही भूकंपापेक्षा अधिक म्हणजे 5.3 रिश्टर स्केल एवढी आहे.